धूळ-कचरापेटी आणि मानसिक आरोग्य!
तुम्ही कधी कचरापेटी पाहिली आहे का?
निश्चितच असणार!
प्रत्येकाच्या घरात एक कचरापेटी साठी निश्चित जागा असते जिथे आपण सगळा केर-कचरा, धूळ, उष्टे-खरकटे आणि नको असलेल्या गोष्टी त्यात टाकत असतो….
का टाकत असतो? कारण आपल्याला त्या गोष्टींची गरज नसते…
ती गोष्ट वापरून तरी झाली असते किंवा त्याची उत्पादकता संपलेली असते. केर काढून झाल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते..आजूबाजूची घाण गेल्यावर आपल्याला प्रफुल्लित वाटते…कारण स्वच्छता सगळ्यांनाच प्रिय असते..आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती असते की, ही धूळ, घाण आणि अस्वच्छता जर अशीच घरात राहिली तर आपण तिथे राहू शकणार नाही…दुर्गंधी आणि गलिच्छता यामुळे आपण आजारी पडू….! पण कधी हा विचार केला आहे का, आपण न दिसणाऱ्या अनेक अस्वच्छता बाळगून असतो.. खूप साऱ्या नको असलेल्या गोष्टी साठवून ठेवत असतो…कारण एक अदृश्य कचरापेटी आपण आपल्या जवळ सतत ठेवत असतो… जो ब्रेन आपल्या मनाची काळजी घेतो त्या अफाट ब्रेन च्या एका छोट्याश्या कप्प्यात आपण ही कचरापेटी जपून ठेवतो..
आता तुम्ही म्हणाल, कचरापेटी कशी?
तर…जे अनावश्यक काळज्या, भीती, चिंता आपण साठवून ठेवतो तेव्हा आपल्या सक्षम मेंदूच्या एका भागात नको असलेला कचरा आपण वाढवत असतो..आणि असा वाढलेला कचरा एका कचरापेटी होण्यास वेळ लागत नसतो! माझ्या कडे एक केस आली होती, ज्यामध्ये एका व्यक्तीने मला सांगितले की 15 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमुळे तिला अजूनही त्रास होत होता.. याचाच अर्थ तिने ही घटना 15 वर्षे आपल्या ब्रेन च्या आत घट्ट पकडून ठेवली होती… घटना घडून गेल्यावर त्या घटनेचा प्रतिसाद कसा द्यायचा हे पूर्णतः आपल्या हातात असते पण आपण आपल्या हाता बाहेरच्या असलेल्या गोष्टींचा खूप अंशी विचार करून स्वतःला त्रास करून घेतो.
आपण सगळे घरातील कचरापेटी ही बिनधास्त वापरत असतो, पण हीच कचरापेटी जर आपल्याला स्वच्छ करावी लागतेही… तसेच आपण आपल्या मेंदूला कसेही वापरले आणि त्यात अनेक नको असलेले विचार भरून ठेवले तर त्या मेंदूच्या स्वछतेचे काय? ही स्वच्छता कधी करायची? अनेक त्रास जे आपण जपून ठेवले आहेत त्यांना कधी बाहेर काढायचे?
दुःखद घटनांना कधी लांब सारायचे? कधी आयुष्यात मनसोक्त जगायला शिकायचे? जगात जर कुठलीही गोष्ट शाश्वत नाही असे आपण मानले तर तुम्ही करत असलेल्या काळज्या या खूप छोट्या वाटायला लागतील… तुम्ही ज्या समस्येत अडकलेले आहात ते तुम्हाला क्षुद्र वाटायला लागतील… माणूस रूपात जर आपण जन्म घेतला आहे तर आपल्याकडे असीम बुद्धिमत्ता आहे हा विचार करून कुठल्याही नश्वर गोष्टींचा आपण त्रास करून घेणार नाही..
आयुष्य सुंदरपणे जगण्यासाठी महत्वाचे आहे ते म्हणजे आपल्या लाडक्या मन- मेंदूची आतून स्वच्छता! ठराविक काळानंतर ह्या स्वच्छतेची गरज भासते आणि हो हे करायला आपल्याला नक्की जमेल…!
जसे हे करत जाल तसे तुम्हाला मानसिक दृष्टया जास्त सुदृढ झालेलं जाणवेल!
काळजी करू नका, काळजी घ्या!